महाराष्ट्र दुष्काळ GR: महाराष्ट्रातील पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्या कोरड्या दुष्काळासंदर्भातील शासन निर्णय (GR) काढण्यात येईल, अशी घोषणा केली.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून थेट आर्थिक मदत देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा, अन्नधान्य तसेच काही भागात मुलांच्या शिक्षणाशी संबंधित अडचणींमध्येही मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. ज्या भागात पाण्याची उपलब्धता असेल, तिथे रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना मदत केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली
कर्जमाफीबाबत काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सुरू असलेली कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे सांगितले. तसेच 2016-17 मधील कर्जमाफीच्या प्रक्रियेत लाभापासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल, असे त्यांनी आज सांगितले.
जाहीर होणाऱ्या दुष्काळाच्या GR मध्ये नेमक्या कोणत्या भागांचा समावेश होतो, मदतीचे निकष काय असतील आणि शेतकऱ्यांच्या खात्यात किती मदत जमा होईल, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.GR जारी झाल्यानंतर त्यातील पात्रता, मदतीची रक्कम आणि जिल्हानिहाय माहिती स्पष्ट होईल.


